Click here to listen to the story.
२०२६ या वर्षात, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून २५० वर्षं झाली. हा प्रसंग साजरा करत असताना अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या शिल्पकारांचं स्मरण करणं अगत्याचं ठरतं. ज्या थोर स्त्री पुरुषांनी स्वतंत्र अमेरिकेच्या उभारणीत आपलं लक्षणीय योगदान दिलं अशा नेत्यांच्या, विचारवंतांच्या, सुधारकांच्या, संशोधकांच्या आणि द्रष्ट्यांच्या कथा आपण या विशेष लेखमालेतून जाणून घेणार आहोत. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा विचार करताना सर्वप्रथम उल्लेख करायला हवा तो राष्ट्रपिता थॉमस जेफरसन यांचा. ते स्वातंत्र्य आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजदेखील जाणवतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्याच्या कामी त्यांना जॉन ॲडम्स यांनी साहाय्य केलं होतं. आपला दृढ विवेक, तत्वनिष्ठा, कठोर परिश्रम त्याचप्रमाणे तेजस्वी लेखणीमुळे ते अमेरिकेचा कणा म्हणूनच ओळखले जातात. त्यांनीच अमेरिकेला प्रामाणिकपणा, कायदा आणि सुव्यवस्थेची देणगी दिली आहे.
सुरुवातीचे आयुष्य
जॉन ॲडम्स यांचा जन्म ३० ऑक्टोबर १७३५ रोजी मॅसॅच्युसेट्स राज्यात, डिकन ऍडम्स आणि सुझॅना बॉयल्स्टन या दांपत्यापोटी, ब्रेन्ट्री येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि चर्मकार होते. वडिलांकडून नीतिमत्ता आणि चळवळ्या स्वभाव त्यांना वारशात मिळाला होता. अॅडम्स लहानपणापासून बुद्धिमान, मेहनती आणि गंभीर स्वभावाचे होते.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी हार्वर्ड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १७५५ साली कायद्याची पदवी प्राप्त केली. पुढे वकील म्हणून काम करताना त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनमानसात वाढणारी नाराजी जवळून पाहिली. भोवतालची परिस्थिती एक ना एक दिवस सुधारेल अशी त्यांना वाटणारी आशा दशकभरातच मावळली.
क्रांतीपूर्व काळ
१७६५ मध्ये ब्रिटिश संसदेनं स्टॅम्प अॅक्ट मंजूर केला. . या कायद्यातल्या जुलुमी तरतुदींना विरोध करणारा ‘कॅनन आणि फ्युडल लॉ’वर त्यांनी निबंध लिहिला. तो इंग्लंडभर गाजला. या निबंधाने ते एक विद्वान टीकाकार म्हणून प्रसिद्धी पावले. मात्र ते नेहमी कायद्याचा आदर करणारे होते.
१७७० साली झालेल्या बोस्टन हत्याकांड प्रकरणात ऍडम्स यांनी ब्रिटिश सैनिकांच्या बाजूने खटला लढवला आणि त्यांची निर्दोष मुक्तता करवली. त्यांच्या दृष्टीने लोकप्रियतेपेक्षा कायदा महत्वाचा होता. १७७४ मध्ये ते पहिल्या कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १७७६ पर्यंत ते स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते बनले. कॉन्टिनेंटल आर्मीचंचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांचं नामनिर्देशन केलं. ते दुसऱ्या काँटिनेंटल काँग्रेसमध्ये राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाऊ लागले.
स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि मुत्सद्देगिरी
स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा थॉमस जेफरसन यांनी लिहिला असला तरी त्या जाहीरनाम्याला काँग्रेसमध्ये जोरदार पाठिंबा देण्याचं काम जॉन ॲडम्स यांनी केलं. आपल्या प्राणाचीही पर्वा न करता त्यांनी त्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करून ब्रिटिश राजसत्तेला थेट आव्हान दिले.
१७७९ मध्ये ऍडम्स यांना युरोपमध्ये पाठवण्यात आलं. त्यांनी नेदरलँड्सकडून आर्थिक मदत मिळवली. १७८३ च्या पॅरिस कराराने युद्ध संपुष्टात आलं. अमेरिकेची पश्चिम सीमा मिसिसिपीपर्यंत विस्तारून, देशाच्या सार्वभौमत्वाला पुष्टी मिळण्यात जॉन ऍडम्स यांची रोखठोक भूमिका फार महत्वाची ठरली.
सरकारविषयक विचार
अमेरिकन घटनेचा वैचारिक पाया जॉन ॲडम्स यांनी घातला. सशक्त लोकशाहीसाठी संतुलित शासनव्यवस्था, द्विसदनीय विधिमंडळ आणि स्वायत्त न्यायव्यवस्था असावी असं प्रतिपादन त्यांनी केलं. सद्वर्तन, नैतिकता, संस्थात्मक रचना या बाबींवरील त्यांच्या विश्वासाने केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर इतर अनेक राज्यांच्या संवैधानिक घटनांवर प्रभाव पडला.
उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष
१७८९ मध्ये ॲडम्स अमेरिकेचे पहिले उपराष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या मते हे पद अत्यंत गौण होतं. मात्र तरीही, त्यांनी हा पदभार सांभाळताना चांगला आदर्श घालून दिला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ३१ वेळा त्यांचं टाय ब्रेकर मत दिलं. आजवरच्या कोणाही उपराष्ट्राध्यक्षाने ही संख्या गाठलेली नाही. त्यांचं झुकतं माप संघराज्यवाद्यांच्या बाजूने होतं त्यामुळे सरकारचं सशक्तीकरण झालं. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी अपेक्षित असणारी तटस्थता आणि शुचिता अबाधित राखण्यासाठी ऍडम्स यांनी संसदेतल्या वादविवादात सहभागी होणं अथवा प्रवास करणं टाळलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांच्या नैराश्यासोबतच त्यांचा संविधानावरचा अढळ विश्वास आणि संयम यांचं दर्शन घडतं.
निवडणुकीत आपले पूर्वीचे सहकारी थॉमस जेफरसन यांच्यावर मात करत जॉन ॲडम्स हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यानंतर झालेले अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष. त्यांच्या कार्यकाळात फ्रान्सशी तणाव वाढला. पॅरिस करारामुळे संतप्त झालेल्या फ्रेंच नेतृत्वाने अमेरिकन जहाजांवर हल्ले सुरु केले. तेंव्हा ऍडम्स यांनी १७९८ मध्ये आपलं आरमार शक्तिशाली बनवलं मात्र प्रत्यक्ष युद्ध टाळलं. या प्रकारात ॲडम्स यांचं राजकीय स्थान धोक्यात आलं मात्र अमेरिकेचं नवोदित गणराज्य सुरक्षित राहिलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी ॲडम्स यांनी एलियन आणि सेडिशन कायद्यांना मंजुरी दिली. पुढे एक्स वाय झेड प्रकरणामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये नाराजी पसरली. १८०० सालची निवडणूक आपले प्रतिस्पर्धी जेफरसन यांच्याकडून हरल्यानंतर जॉन ऍडम्स १८०१ साली नवोदित लोकशाहीवादी राष्ट्राचे आदर्श राष्ट्राध्यक्ष म्हणून निवृत्त झाले.
निवृत्ती आणि वारसा
राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ॲडम्स मॅसॅच्युसेट्स राज्यामध्ये क्विन्सी शहरात राहू लागले. पुढील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी अनेक पत्रं, आठवणी आणि आत्मपरीक्षणपर असं विपुल लेखन केलं. थॉमस जेफरसन यांच्याशी त्यांचा विविध विषयांवरचा पत्रव्यवहार अमेरिकन इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपला पुत्र जॉन क्विन्सी ऍडम्स हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष झालेला बघण्याचं भाग्य त्यांना लाभलं.
जॉन ॲडम्स यांनी एकदा लिहिलं होतं की स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किती किंमत मोजावी लागली हे पुढील पिढ्यांना कदाचित कधीच पूर्णपणे कळणार नाही. पण कायद्याचा सन्मान, शांततापूर्ण सत्ता हस्तांतरण आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्व यामध्ये अॅडम्स यांचा वारसा आजही टिकून आहे.



