लेखक: रोहित कुलकर्णी/शुभदा सुभेदार
ही मुलाखत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. Spotify or Apple Podcast
“मला आर्टिस्ट व्हायचंच आहे,” हे शची काळे यांनी लहानपणीच ठरवले होते.
अनेक भारतीय मुलांप्रमाणे त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील होण्याचा दबाव कधीच आला नाही, उलट त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला आणि हाच विश्वास त्यांना मुंबईतून अमेरिकेतील अँरिझोनापर्यंत घेऊन आला. आज अॅरिझोनातील अनेक सार्वजनिक ठिकाणी उदा—ग्रंथालये, उद्याने, मुलांच्या खेळाच्या जागा आणि शहरातील भिंतींवर शची यांची कलाकृती कायमस्वरूपी पाहायला मिळते. खर तर शची चा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
बालपणापासून कलेची आवड.
शची यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांच्या घरात वाचनाची मोठी परंपरा होती. आई-वडील भरपूर पुस्तके वाचत आणि आणतही, घरात भारत, रशिया, चीन आणि युरोपमधील सुंदर चित्रांनी सजलेली अनेक बालपुस्तके होती. याच पुस्तकांनी त्यांच्या मनात कलेची पहिली बीजे रोवली.
त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रसिद्ध चित्रकार बाबूराव सदवेलकर आणि त्यांच्या पत्नी विजया (विजू ताई) सदवेलकर यांचा सहवास. चौथीपासून दहावीपर्यंत त्या दर शनिवारी विजू ताईंकडे चित्रकलेचे धडे घेत असत. त्यांच्या घरी कलेचे वातावरण होते व कलाकारांची ये-जा होती आणि तिथेच शची यांनी प्रथम कलाकाराचे जीवन जवळून पाहिले.
दहावीनंतर वडील हार्वर्ड विद्यापीठात असताना त्यांना युरोपला जाण्याची संधी मिळाली. पॅरिसमधील प्रसिद्ध Musée d’Orsay संग्रहालयात त्यांनी मोने, माने आणि टुलूज-लॉत्रेक यांसारख्या महान चित्रकारांची मूळ चित्रे पाहिली. त्या अनुभवाने त्यांच्या मनावर खोल छाप पाडली.
जाहिरात क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द
फाइन आर्ट्समध्ये करिअर करणे कठीण वाटत असल्याने त्यांनी सोफिया पॉलिटेक्निक, मुंबई येथे ग्राफिक डिझाइनचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मुंबईतील आघाडीच्या जाहिरात संस्थेत काम केले. काही वर्षांनी एका मैत्रिणीसोबत स्वतःचा डिझाइन स्टुडिओ सुरू केला. MTV, Sony Music आणि वन्यजीव अभ्यासक वाल्मिक थापर यांसारख्या प्रतिष्ठित लोकांसाठी त्यांनी काम केले.
लग्नानंतर अमेरिकेत नवे आयुष्य
लग्नानंतर शची अमेरिकेत आल्या. हे करिअरसाठी आखलेले पाऊल नव्हते. त्या H-4 व्हिसावर अमेरिकेत आल्या म्हणून सुरुवातीला त्यांना काम करण्याची परवानगी नव्हती. भारतात त्यांनी उभी केलेली ओळख एका क्षणात मागे राहिली. “माझी ओळखच हरवल्यासारखी झाली होती,” असे त्या सांगतात. सुरुवातीला त्या कॅलिफोर्नियात राहिल्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब अॅरिझोनातील फिनिक्स येथे स्थायिक झाले.
पुन्हा शून्यापासून सुरुवात
शचीला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नवा देश, नवी माणसे आणि पूर्णपणे वेगळी व्यवस्था. अॅरिझोनामध्ये त्यांना एकही कलाकार माहीत नव्हता. त्यांच्या आसपासचे बहुतेक भारतीय सॉफ्टवेअर, बँकिंग किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते. आपला मार्ग शोधण्यासाठी त्यांनी स्थानिक कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अमेरिकेत वापरले जाणारे संगणक, सॉफ्टवेअर, प्रिंटिंगची पद्धत आणि कामाची भाषा—सगळेच नव्याने शिकावे लागले.
तिथेच त्यांच्या एका शिक्षिकेने त्यांची ओळख कॉलेजच्या मार्केटिंग विभागाशी करून दिली. त्यांना अर्धवेळ ग्राफिक डिझायनर म्हणून काम मिळाले. ही संधी त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरली. आज जवळपास २५ वर्षांपासून त्या त्या संस्थेसाठी फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहेत.
कलाकार पुन्हा जागा झाला
ग्राफिक डिझाइनमुळे आर्थिक स्थैर्य मिळाले, पण मन मात्र अजूनही चित्रकलेकडेच ओढले जात होते. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांनी Art Marketing ह्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ईथे त्यांनी कलाकार म्हणून स्वतःची ओळख कशी निर्माण करायची,प्रदर्शन कसे भरवायचे,गॅलरीशी कसा संपर्क साथायचा हे सर्व शिकल्या, आणि याच अभ्यासक्रमांनी त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.
पहिले सोलो प्रदर्शन आणि मोठे यश

२०१८ मध्ये फिनिक्समध्ये त्यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन (Solo Exhibition) भरले. या प्रदर्शनाचे नाव होते “Conversations With Myself.”
अमेरिकेत स्थलांतरानंतरचा एकटेपणा, चिंता, आशा आणि स्वतःशी चाललेला संवाद या भावनांवर आधारित जवळपास ५५ जलरंग चित्रे त्यांनी अवघ्या काही महिन्यांत तयार केली. या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे जवळपास ८० ते ९० टक्के चित्रे विकली गेली. शचींसाठी हा केवळ आर्थिक यशाचा क्षण नव्हता, तर त्यांच्या कलेला मिळालेली खरी दाद होती.
स्थलांतराचा अनुभव कलेतून
यानंतरच्या त्यांच्या दुसऱ्या सोलो प्रदर्शनात त्यांनी स्थलांतराचा अनुभव परीकथांच्या माध्यमातून मांडला. घरापासून दूर जाणे, एकटेपणा, नव्या देशात स्वतःला शोधण्याचा संघर्ष आणि आशा—या सगळ्या भावना त्यांच्या चित्रांतून व्यक्त झाल्या. या प्रदर्शनाला अनेक ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आणि Philadelphia Inquirer या वृत्तपत्राने त्याची दखल घेतली.

अॅरिझोनाच्या सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कला
पुढे शची यांना Tempe Center for the Arts येथे Artist-in-Residence म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या City of Chandler Arts Commission वर सदस्य म्हणूनही कार्य करू लागल्या. या अनुभवामुळे सार्वजनिक कलेच्या अनेक संधी त्यांच्यासमोर खुल्या झाल्या. आज त्यांच्या अनेक कायमस्वरूपी कलाकृती अॅरिझोनामध्ये पाहायला मिळतात.
त्यामध्ये— प्रामुख्याने पहायला मिळणाऱ्या कलाकृती पुढील प्रमाणे
Tempe Public Library येथील भव्य भित्तीचित्र
टेम्पे शहरातील दोन उद्यानांमधील मुलांच्या खेळाच्या जागांची रंगीत रचना
Scottsdale येथील डॉग पार्कमधील धातूवरील कलाकृती
Chandler येथील युटिलिटी बॉक्सवरील सार्वजनिक चित्रकला
Desert Botanical Garden आणि Mesa Arts Center येथील मोठ्या कला प्रकल्पांचा समावेश आहे.

अॅरिझोनावर प्रेम कधी जडलं?
शची हसत सांगतात, “आम्ही ऑगस्टमध्ये अॅरिझोनात आलो. बाहेर ११५ फॅरेनहाइट तापमान होतं. गाडीतून उतरताच मला वाटलं—इथे माणूस कसा राहतो?” पण हळूहळू त्यांना वाळवंटाचं सौंदर्य दिसू लागलं. सूर्यास्ताचे रंग, कॅक्टसची झाडं, वाळवंटातील फुले आणि निसर्गातील नक्षी त्यांच्या चित्रांमध्ये उतरू लागली. भारतीय भारतीय मिनिएचर पेंटिंग, मधुबनी आणि लोककलेचा प्रभाव अॅरिझोनाच्या रंगांशी मिसळून आज त्यांची स्वतःची वेगळी शैली तयार झाली आहे.

कला म्हणजे घर
आज शची काळे रोज काही ना काही नवीन चित्र काढतात. नवीन सार्वजनिक कला प्रकल्प, प्रदर्शनं आणि सर्जनशील प्रयोग सुरूच आहेत. त्यांचा प्रवास हा केवळ एका कलाकाराचा यशस्वी प्रवास नाही. तो आहे नव्या देशात पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, संघर्षातून मार्ग काढण्याचा आणि कलेच्या माध्यमातून नवे घर शोधण्याचा प्रवास. शची काळे यांच्यासाठी आज “घर” म्हणजे फक्त एखादे शहर किंवा देश नाही. जिथे त्यांची कला लोकांच्या मनाला स्पर्श करते, तिथेच त्यांना आपलेपणाची भावना मिळते.
शची काळे वेबसाइट: https://www.shachikale.com/
Instagram: @shachidreams



