अमेरिकेतील अनेक छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये कॉलेज म्हणजे केवळ शिक्षणसंस्था नसून ते त्या शहराचं आर्थिक केंद्र असतं, सांस्कृतिक हृदय असतं, शनिवारच्या गर्दीचं कारण असतं, कॉफी शॉप चालू ठेवणारं अस्तित्व असतं आणि तरुण पिढी गावात राहील, अशी एक शांत आशा असते. पण आता हीच आशा हळूहळू विरत चालली आहे. अमेरिकेतील ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील महाविद्यालयांवर अभूतपूर्व संकट कोसळत आहे. विद्यार्थीसंख्या झपाट्याने घटत आहे, लोकसंख्येची रचना बदलत आहे.
“विजेता सर्व काही घेऊन जातो”
उच्च शिक्षण क्षेत्रात अशी स्पर्धा निर्माण झाली आहे, ज्यात मोठी प्रतिष्ठित विद्यापीठे आणि राज्यातील फ्लॅगशिप कॅम्पसच वरचढ ठरत आहेत. याचा परिणाम फक्त कॉलेजांवर होत नाही तर सगळी शहरं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हादरत आहेत. या संकटाची चाहूल अनेक वर्षांपासून लागत होती. अमेरिकेत हायस्कूलमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०२५ नंतर कमी होऊ लागली , असा अंदाज अनेक संशोधन संस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात ही घट अधिक तीव्र आहे कारण तिथे आधीच लोकसंख्या कमी, त्यात स्थलांतर जास्त, आणि म्हणूनच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटत आहे व
त्याचवेळी, उच्च शिक्षणाचा बाजार पूर्णपणे बदलला आहे. आयव्ही लीग विद्यापीठे आणि मोठ्या सार्वजनिक विद्यापीठांकडे अर्जांचा पूर येत आहे.
त्यांच्याकडे नाव, ब्रँड, संशोधन सुविधा, खेळ, नेटवर्क्स आणि करिअरच्या मोठ्या संधी आहेत. उलट, छोट्या ग्रामीण कॉलेजांकडे अशा संसाधनांची कमतरता आहे. एकेकाळी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मुख्य आधार असलेली ही महाविद्यालये आता अस्तित्वासाठी झगडत आहेत.
इलिनॉय राज्यातील मॅकॉम्ब शहरातील वेस्टर्न इलिनॉय युनिव्हर्सिटी हे याचं जिवंत उदाहरण आहे. एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांनी गजबजलेला कॅम्पस आता अर्धा रिकामा दिसतो. विद्यार्थीसंख्या जवळपास निम्म्यावर आली आहे. त्याचा परिणाम केवळ कॉलेजपुरता मर्यादित राहिलेला नाही. शहरातील रेस्टॉरंट्स, भाड्याच्या घरांचा व्यवसाय, किरकोळ दुकाने, स्थानिक रोजगार — सगळ्यांवर त्याचा फटका बसला आहे. अनेक दुकानांचे कायमचे shutter down झाले आहेत. मिसिसिपीमधील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीनेही आर्थिक तणावामुळे २० हून अधिक पदवी अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी, इतिहास, संगीत, रसायनशास्त्र यांसारख्या विषयांवर गंडांतर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे — शिक्षणाच्या संधी कमी होणे.
पेनसिल्वेनियातील अनेक प्रादेशिक विद्यापीठांनी तर टिकून राहण्यासाठी एकत्रीकरणाचा मार्ग स्वीकारला. क्लॅरियन, एडिनबोरो आणि कॅलिफोर्निया विद्यापीठे एकत्र आली; ब्लूम्सबर्ग, लॉक हेवन आणि मॅन्सफिल्ड यांनी नवीन संरचना स्वीकारली. हे फक्त प्रशासकीय बदल नव्हते; ते उच्च शिक्षणातील बदलत्या वास्तवाचं प्रतीक होतं. या संकटात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची घटही महत्त्वाची ठरली आहे. अनेक छोट्या कॉलेजांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या फी वर अवलंबून होते. कोविड महामारी, व्हिसा निर्बंध आणि कडक इमिग्रेशन धोरणांमुळे हा प्रवाह मोठ्या प्रमाणात कमी झाला. मोठ्या विद्यापीठांना हा धक्का सहन करता आला, पण छोट्या कॉलेजांसाठी तो जीवघेणा ठरला.

कॉलेज म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक कणा असतो. ते रोजगार देतात, सांस्कृतिक कार्यक्रम घडवतात, हॉस्पिटल्स आणि स्थानिक सेवांना आधार देतात, आणि शहराला ओळख मिळवून देतात. जेव्हा कॉलेज कमकुवत होतं, तेव्हा गावातील तरुण बाहेर पडू लागतात. कर महसूल घटतो. शाळा रिकाम्या होतात. शहरात एक प्रकारची उदासीनता पसरते.
तरीही काही कॉलेजांनी नव्या मार्गांचा शोध सुरू केला आहे. अनेक संस्था आता प्रौढ विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ऑनलाइन आणि हायब्रिड अभ्यासक्रम सुरू करत आहेत. काही स्थानिक उद्योग, रुग्णालये आणि व्यवसायांशी भागीदारी करून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विकसित करत आहेत. आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, शेती आणि कौशल्याधारित शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे.
आज प्रश्न फक्त कॉलेज वाचवण्याचा नाही. प्रश्न आहे — छोट्या शहरांचं भविष्य वाचवण्याचा. कारण ग्रामीण कॉलेज केवळ शिक्षण देत नाहीत तर ती स्वप्नं जिवंत ठेवतात. ती स्थानिक मुलांना गाव सोडल्याशिवाय भविष्य घडवण्याची संधी देतात. ती समाजाला दिशा देतात. आणि म्हणूनच, जेव्हा कॉलेज आकसतं — तेव्हा फक्त वर्गखोल्या रिकाम्या होत नाहीत. संपूर्ण गाव हळूहळू कोसळू लागतं.



