लेखक: विनायक काळे
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सतत प्रवास करणाऱ्या कोणालाही एक गोष्ट लगेच जाणवते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिका जगात आघाडीवर असली, तरी रोजच्या व्यवहारांमध्ये भारत अनेक बाबतीत कितीतरी पुढे असल्याचं दिसतं.
पुणे, मुंबईसारख्या एखाद्या मोठया शहरातल्या किंवा एखाद्या छोट्या शहरातल्या हमरस्त्यावरून जर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की कोणताही चहावाला असो किंवा पानटपरीवाला, भाजीविक्रेता असो अथवा रिक्षाचालक असो, या सगळ्यांचा व्यवसाय अगदी छान चाललाय तो त्यांच्याकडे असलेल्या स्मार्टफोनवर किंवा QR कोडवर! ग्राहकाने त्याच्या मोबाईलवरून QR कोड स्कॅन केला की अवघ्या काही सेकंदांत पैसे व्यावसायिकाच्या खात्यात जमा होतात. ना सुट्ट्या पैशांची चिंता, ना कार्ड मशीनची गरज, ना ट्रँझॅक्शन चार्जेस. अमेरिकेत मात्र चित्र वेगळं आहे.
आजही अमेरिकेतल्या अनेक आस्थापनांमध्ये आणि छोट्या व्यवसायांमध्ये क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड अथवा Square, Clover किंवा Toast सारख्या पेमेंट सिस्टीम वापरण्यावरच जास्त भर असतो. या सिस्टिम्स विश्वासार्ह असल्या, तरी त्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रत्येक व्यवहारावर साधारण २ ते ४ टक्के शुल्क मोजावं लागतं कारण हे व्यवहार वेगवेगळ्या बँका आणि कार्डांच्या प्रणालीत फिरून मग पुढे सरकत असतात. भारतातल्या UPI प्रमाणे बँकेतून बँकेत थेट आणि जवळपास मोफत व्यवहार करण्याची व्यवस्था अमेरिकेत अजूनही नाही.
पण याचा अर्थ अमेरिका मागे आहे, असे अजिबात नाही.

भारताने डिजिटल पेमेंटमध्ये मोठी क्रांती घडवली, तर अमेरिका आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून छोट्या व्यवसायांमध्ये नवी क्रांती घडवत आहे.
भारतातील डिजिटल बदलाची सुरुवात दोन गोष्टींनी झाली—स्वस्त स्मार्टफोन आणि UPI.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) माहितीनुसार, आज भारतात ७५ कोटींहून अधिक लोक स्मार्टफोन वापरतात. पूर्वी लक्षावधी रुपयांना असलेले मोबाईल फोन्स आज काही हजार रुपयांत उपलब्ध आहेत.
यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसाठी स्मार्टफोन हा फक्त फोन राहिलेला नाही. तोच त्यांचा कॅलक्युलेटर, पेमेंट मशीन, स्टॉक रजिस्टर, जाहिरात करण्यासाठीचा मंच आणि ग्राहकांशी संपर्क ठेवण्याचं साधन बनला आहे.
२०१६ मध्ये UPI सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बदलली.
एका साध्या QR कोडमुळे लाखो छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट्स तत्काळ स्वीकारता येऊ लागली. रोखीचे व्यवहार कमी झाले, हिशोब ठेवणं सोपं झालं आणि अशा प्रकारे डिजिटल माध्यमातून हिशोब ठेवले जाऊ लागल्याने अनेकांना बँकेकडून कर्ज मिळवणं सुलभ झालं.
अमेरिकेची AI क्रांती
अमेरिकेत UPI सारखी डिजिटल पेमेंट क्रांती झाली नसली, तरी AI मुळे व्यवसाय करण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे.
पूर्वी फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवडू शकतील अशी एआय साधनं आता अगदी छोट्या व्यवसायांसाठीही उपलब्ध झाली आहेत. उदाहरणार्थ—
ओहायोमधला एखादा छोटा हॉटेलवाला AI च्या मदतीने आठवड्याच्या शेवटी किती ग्राहक येतील याचा अंदाज लावू शकतो. ऑस्टिनमधील एखादा फूड ट्रकवाला हवामानाचा अंदाज, स्थानिक कार्यक्रम आणि पूर्वीच्या विक्रीच्या आकडेवारीच्या आधारे किती बर्गर्स तयार करायचे हे ठरवू शकतो. सिऍटलमधला एखादा छोटेखानी कॉफी शॉपवाला AI च्या मदतीने स्टॉकच्या नोंदी सांभाळू शकतो, कर्मचाऱ्यांचं वेळापत्रक तयार करू शकतो आणि नेहमीच्या ग्राहकांना विशेष ऑफरही पाठवू शकतो. जी कामं करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मोठी टीम आणि महागडे सल्लागार लागायचे ती सर्व कामं आता एखाद्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कमी खर्चात करता येतात.

AI म्हणजे एक डिजिटल कर्मचारी
आज AI अनेक छोट्या व्यवसायांसाठी एखाद्या कर्मचाऱ्याप्रमाणे काम करत आहे.
समजा टेक्सासमध्ये एखादा लँडस्केपिंग व्यवसाय एकच व्यक्ती चालवत असेल तर त्याला ग्राहकांच्या ई-मेल्सना उत्तर देणं, बिल तयार करणं, सोशल मीडियासाठी पोस्ट लिहिणं, भेटींचं वेळापत्रक ठरवणं आणि स्थानिक मागणी पाहून योग्य दरही सुचवणं अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी AI उपयुक्त ठरतं. याचप्रमाणे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, फोटोग्राफर किंवा रिअल इस्टेट एजंटही आपली रोजची अनेक कामं AI च्या मदतीने सहज करू शकतात.
भारतातही हेच तंत्रज्ञान चहावाल्याला दुसऱ्या दिवशी किती चहा लागेल याचा अंदाज देऊ शकतं, पुरवठादारांना संदेश पाठवू शकतं किंवा मराठीत आणि हिंदीत जाहिराती तयार करू शकतं.
दोन देश, दोन वेगळे मार्ग
भारत आणि अमेरिका या दोन्हीही देशांकडे एकमेकांकडून शिकण्यासारखं पुष्कळ काही आहे. दोन्ही देश तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, पण त्यांचा मार्ग वेगळा आहे.
भारताने प्रथम डिजिटल पेमेंटची समस्या सोडवली. स्वस्त स्मार्टफोन आणि UPI मुळे लाखो छोटे व्यापारी एका रात्रीत औपचारिक डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग बनले. सुलभ आणि स्वस्त डिजिटल पायाभूत सुविधांमुळे लाखो लोकांची आयुष्यं बदलून गेली हे भारताने दाखवून दिलं.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारणं, नासाडी कमी करणं आणि सुयोग्य असे निर्णय घेणं आता छोट्या व्यावसायिकांनाही शक्य झाल्याने ते तुलनात्मक दृष्ट्या मोठ्या व्यायसायांशीही स्पर्धा करू शकतात.
AI तंत्रज्ञान हे फक्त भल्या मोठ्या कंपन्यांसाठीच असतं हा एक सर्वदूर पसरलेला गैरसमज आहे. AI साधनं वापरून एखादा हॉटेल व्यावसायिक आपली जाहिरात करू शकतो, एखादा दुकानदार आपल्या मालाच्या साठ्याच्या नोंदी ठेवू शकतो, एखादा फूड ट्र्कवाला मागणीचा अंदाज घेऊ शकतो तर एखादा दुकानदार आपल्या ग्राहकांच्या कलाचा अंदाज लावू शकतो. स्मार्टफोन्समुळे ज्याप्रमाणे प्रत्येकाला इंटरनेट वापरता येऊ लागलं त्याचप्रमाणे AI मुळे सर्वसामान्य व्यावसायिकालादेखील आपल्या व्यवसायासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सहजी वापरता येऊ लागलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं ही आता केवळ मोठाल्या आस्थापनांची मक्तेदारी राहिलेली नसून लहानातला लहान व्यावसायिकदेखील आता AI किंवा UPI चा वापर करून आपलं काम अधिक सुलभतेने आणि कार्यक्षमतेने करू लागला आहे.
भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट क्रांती घडून येण्यापाठीमागे आपल्यासमोरचे प्रश्न सुलभतेने सोडवणाऱ्या स्वस्त अथवा परवडण्याजोग्या तंत्रज्ञानाचा लहानमोठ्या व्यावसायिकांनी केलेला स्वीकार आहे मग तो UPI ने पैसे स्वीकारणारा पुण्यातला चहावाला असो, स्मार्टफोन वापरून आपल्या स्टॉकचं व्यवस्थापन करणारा पानवाला असो, AI वापरून ग्राहकांच्या संख्येचा अंदाज बांधणारा ऑस्टिनमधला फूड ट्रकवाला असो किंवा स्थानिक कार्यक्रमांचा अंदाज घेऊन कर्मचाऱ्यांची संख्या ठरवणारा छोट्याशा उपाहारगृहाचा चालक असो. आता अमेरिका दाखवून देत आहे की AI देखील अशी क्रांती घडवू शकतं.
इथून पुढे तंत्रज्ञानाचं भवितव्य सिलिकॉन व्हॅली किंवा बेंगळुरूमध्येच ठरेल असं नाही तर आपले व्यवसाय अधिक परिणामकारक पद्धतीने चालवणाऱ्या अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांच्या हातात हे तंत्रज्ञान रुळू लागलं आहे. आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा आपलं आयुष्य सुखकर करणारं तंत्रज्ञान श्रेष्ठ म्हणायला हवं. भारतात ते QR कोडच्या रूपात आलं आहे तर अमेरिकेत AI च्या रूपात असं म्हणता येईल.

