२०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हॉलीवूड चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘द ओडिसी‘ (The Odyssey). ऑस्कर विजेते दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा हा नवा चित्रपट ग्रीक कवी होमर यांच्या प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित आहे.
ही कथा आहे ओडिसियस या ग्रीक योद्ध्याची. ट्रोजन युद्ध संपल्यानंतर आपल्या घरी परतण्यासाठी तो दहा वर्षांचा कठीण आणि थरारक प्रवास करतो. या प्रवासात त्याला अनेक राक्षस, देव-देवता, समुद्री संकटे आणि अद्भुत आव्हानांचा सामना करावा लागतो.
या चित्रपटात मॅट डेमन ओडिसियसची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत अॅन हॅथवे, टॉम हॉलंड, झेंडाया, रॉबर्ट पॅटिन्सन, ल्युपिटा न्योंगो, शार्लीझ थेरॉन, जॉन बर्नथल, बेनी सफ्दी, जॉन लेगुइझामो, सामंथा मॉर्टन, मिया गॉथ, हिमेश पटेल आणि इतर अनेक नामवंत कलाकार आहेत. इतका मोठा स्टारकास्ट अलीकडच्या काळात फार कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला आहे.
या चित्रपटासाठी अंदाजे २५० दशलक्ष डॉलर (सुमारे २,१०० कोटी रुपये) इतका प्रचंड खर्च झाला असून, तो नोलन यांच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे.
नेहमीप्रमाणेच नोलन यांनी या चित्रपटात संगणकीय दृश्यांवर (CGI) जास्त अवलंबून न राहता प्रत्यक्ष लोकेशन्स, खऱ्या जहाजांचा वापर, मोठे सेट आणि IMAX कॅमेऱ्यांवर चित्रीकरण करण्यावर भर दिला आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण सहा देशांमध्ये ९१ दिवस चालले.
युनिव्हर्सल पिक्चर्स हा चित्रपट १७ जुलै २०२६ रोजी जगभर प्रदर्शित करणार आहे. ओपेनहायमरच्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाकडूनही प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीला मोठ्या अपेक्षा आहेत.
आजच्या काळातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शकांमध्ये ख्रिस्तोफर नोलन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी असे चित्रपट दिले आहेत, जे केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतात.
२००० साली आलेल्या ‘मेमेंटो‘ (Memento) या चित्रपटामुळे नोलन यांना जागतिक ओळख मिळाली. उलट्या कालक्रमाने सांगितलेल्या या कथेमुळे चित्रपटसृष्टीत नवे प्रयोग सुरू झाले.
त्यानंतर त्यांनी ‘बॅटमॅन बिगिन्स‘, ‘द डार्क नाईट‘ आणि ‘द डार्क नाईट रायझेस‘ या चित्रपटांद्वारे सुपरहिरो चित्रपटांची व्याख्याच बदलून टाकली. विशेषतः ‘द डार्क नाईट‘ हा आजही जगातील सर्वोत्तम सुपरहिरो चित्रपटांपैकी एक मानला जातो.
यानंतर ‘द प्रेस्टिज‘, ‘इन्सेप्शन‘, ‘इंटरस्टेलर‘, ‘डंकर्क‘, ‘टेनेट‘ आणि ऑस्कर विजेता ‘ओपेनहायमर‘ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांनी नोलन यांची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये वेळ, स्मरणशक्ती, स्वप्ने, विज्ञान, नैतिकता, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न यांचा नेहमीच शोध घेतला जातो.
नोलन यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते शक्य तितके प्रत्यक्ष चित्रीकरणावर भर देतात.
आज अनेक चित्रपटांमध्ये CGI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण नोलन यांना खऱ्या ठिकाणी, खऱ्या सेटवर आणि प्रत्यक्ष कॅमेऱ्यांमधून चित्रीकरण करणे अधिक आवडते.
टेनेट’ मध्ये त्यांनी खरे विमान उडवून अपघाताचे दृश्य चित्रित केले. ‘ओपेनहायमर’ मध्ये अणुबॉम्ब चाचणीचे दृश्य शक्य तितके वास्तववादी पद्धतीने साकारले. आणि आता द ओडिसी’ साठी त्यांनी मोठी जहाजे आणि प्रत्यक्ष लोकेशन्स वापरून आणखी एक भव्य चित्रपट तयार केला आहे.
त्यांचे चित्रपट जगभरात ६ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करून गेले आहेत. अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले असून, ‘मेमेंटो‘, ‘द डार्क नाईट‘ आणि ‘इन्सेप्शन‘ यांसारख्या चित्रपटांना अमेरिकेच्या National Film Registry मध्येही स्थान मिळाले आहे. ख्रिस्तोफर नोलन यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतात.
त्यांचे चित्रपट एकदाच पाहून संपत नाहीत. ते पुन्हा पाहावेसे वाटतात, त्यावर चर्चा होते आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सापडते. आता ‘द ओडिसी’ च्या माध्यमातून नोलन जगातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध कथांपैकी एक कथा नव्या पिढीसमोर आणत आहेत.
त्यामुळे हा चित्रपट केवळ भव्य दृश्यांचा अनुभव देणार नाही, तर धैर्य, संघर्ष, चिकाटी आणि “घरी परतण्याची” प्रत्येक माणसाच्या मनातील ओढ यांचीही भावनिक कथा सांगेल.
Main image and video courtesy: https://www.odysseymovie.com/



